माढा लोकसभेची निवडणूक ही जनतेने हातात घेतली आहे. ही निवडणूक मोहिते पाटील कुटुंबाची राहिलेली नाही. कोणत्या उमेदवाराला निवडून द्यायचे जनता जनार्दनच ठरवेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले.केम येथे प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
या सभेत करमाळा तालुका भटक्या विमुक्त जमाती संघटना, केम येथील मुस्लिम युवक संघटना व जुनी सेवानिवृत्त पेन्शन संघटनेने मोहिते- पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला. मोहिते पाटील म्हणाले की ही निवडणूक मोहिते- पाटील यांनी लढवली नाही, तर इथून पुढे आमच्याकडे यायचे नाही, असा प्रेमळवजा दम तरुणांनी दिला. त्यामुळे मी अनेक गावांचा दौरा केला.सर्व ठिकाणी तरुणांनी काही झाले, तरी मी ही निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला.
त्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या अस्तित्वासाठी, जनतेसाठी, स्वाभिमानासाठी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. यासाठी कोणतेही किंमत मोजावी लागली तरी चालेल, असा निर्धार केला.