भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट अपात्रता प्रकरणाच्या निकालाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. महिला कुस्तीपटू विनेश फोगाट ही पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत 50 किलो वजनी गटात सहभागी झाली. तिने मंगळवारी सलग 3 सामने जिंकून अंतिम फेरीत धडक मारली. त्यामुळे विनेशने भारतासाठी रौप्य पदक निश्चित केलं. तर सुवर्ण पदकासाठीचा सामना हा 7 ऑगस्ट रोजी पार पडणार होता. मात्र अंतिम सामन्याआधी विनेशचं प्रमाणापेक्षा 100 ग्राम वजन जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे विनेशला अपात्र ठरवण्यात आलं.
विनेशने त्यानंतर सीएएस अर्थात कोर्ट ऑफ अबिट्रेशन ऑफ स्पोर्ट या क्रीडा लवादात अपात्रेच्या निर्णयाविरोधात धाव घेतली. सुवर्ण पदकाचा सामना खेळण्याची विनंती फेटाळल्यानंतर विनेशने संयुक्तरित्या रौप्य पदक देण्याची मागणी विनेशची आहे. हरीश साळवे आणि विदुष्पत सिंघानिया या निष्णात कायदेपंडितांनी 9 ऑगस्ट रोजी क्रीडा लवादात विनेशची बाजू मांडली. विनेशनेही व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपली बाजू सांगितली.
जवळपास 3 तास हा युक्तीवाद चालला. त्यानंतर 10 ऑगस्ट रोजी निकाल येणार असल्याचं स्पष्ट झालं. मात्र 10ऐवजी 11 ऑगस्टला निकाल येणार असल्याचं समोर आलं. त्यानंतर आता पुन्हा एकदा या प्रकरणी नवीन तारीख समोर आली आहे. आता या प्रकरणात 13 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत निर्णय येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.