इस्लामपूर येथे पूर्ववैमनस्यातून ज्ञानेश भीमराव पवार (वय ३०, रा. इस्लामपूर) याच्यावर कोयत्याने हल्ला केल्याचा प्रकार नवीन बहे नाका परिसरात रविवारी घडला. याप्रकरणी मानव गवंडी, ओमसाई प्रकाश, बाल्या बंडगर, ताटे (पूर्ण नाव माहीत नाही, सर्व रा. इस्लामपूर) या संशयितांविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या हल्ल्यात ज्ञानेश हा गंभीर जखमी झाला. त्याला कराड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी दुपारी ज्ञानेश, त्याचा मित्र आकाश पवार, सुहान मुल्ला हे बहे चौकात गप्पा मारत बसले होते. त्यावेळी सर्व संशयित तेथे आले.
पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून त्यांनी वाद घातला. ‘लय मस्ती आली’, असे म्हणून ज्ञानेश पवार याला शिवीगाळ केली. ताटे याने कोयत्याने ज्ञानेश याच्या डोक्यात वार केला. संतोष बंडगर याने हॉकी स्टीकने व इतर संशयितांनी हॉकी स्टीक व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. आकाश, सुहान हे भांडणे सोडविण्यासाठी गेले असता ओमसाई प्रकाश याने त्यांनाही हॉकी स्टीकने मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.