कोल्हापुरात पोलिस असल्याची बतावणी करून पिस्तुलाचा धाक दाखवत व्यापाऱ्याच्या कुटुंबाला वेठीस धरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शाहुपुरी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोल्हापूर शहरातील शाहूपुरी चौथ्या गल्लीत व्यापारी संदीप विश्वनाथ नष्टे आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकावण्याचा प्रकार सोमवारी (12 ऑगस्ट) रात्री साडेनऊ ते सव्वादहाच्या दरम्यान घडला.
तब्बल अर्धा तास वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. संबंधित तोतया पोलिस सीसीटीव्हीत कैद झाला आहे.नष्टे यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.व्यापारी नष्टे हे शाहूपुरी येथील चौथ्या गल्लीत कुटुंबीयांसह राहतात. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास एक धिप्पाड इसम नष्टे यांच्या दारात आल्यानंतर नावाची विचारणा करत थेट घरात घुसला. तोंडावर मास्क असल्याने ओळखता आलं नाही.
घरात घुसल्यानंतर संबंधित तरुणाने तुमच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार असून तडजोड करून प्रकरण मिटवणार की वाढवणार? अशी विचारणा केली. संशय बळावल्यानंतर सविस्ती माहिती आणि नाव नष्टे यांनी विचारताच त्याने वाद घातला. त्यानंतर हा तोतया असल्याचे लक्षात येताच नष्टे कुटुंबीयांनी घरातून जाण्यास सांगितले. त्यावेळी संशयिताने पिस्तूल काढून संदीप नष्टे यांच्या दिशेने रोखून धरले. प्रकरण मिटवलं नसल्यास जड जाईल, असा इशारा दिला. कोणालाही सोडणार नाही, असेही धमकावत होता. पिस्तूल पाहताच नष्टे कुटुंबीय भेदरून गेले. गोंधळ वाढल्यानंतर संशयिताने काढता पाय घेत धूम ठोकली. हातात पिस्तूल असूनही त्याने कोणाला जखमी केले नाही. केवळ धमकावून पैसे काढण्याचा प्रकार असावा, असा पोलिसांनी अंदाज वर्तवला आहे.