प्रणिती शिंदे यांच्या ‘सोलापूर शहर मध्य’मध्ये काँग्रेससाठी यंदा डोकेदुखी…..

लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या पूर्वीच्या सोलापूर शहर मध्य मतदारसंघाकडे आतापासूनच सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. ही जागा जिंकण्यासाठी भाजपने आतापासूनच जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

काँग्रेसमधून १८ जण आमदारकीसाठी इच्छूक असताना माकपचे नेते नरसय्या आडम यांनी ही जागा स्वत:साठी मागितली आहे. त्याच वेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या इच्छुकांनी परस्पर दावेदारी असताना मुस्लीम आणि मोची समाजातूनही प्रतिनिधित्व मिळण्यासाठी जोरदार प्रयत्न होत असल्यामुळे ही जागा राखताना काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे.

दुसरीकडे भाजपचा मित्रपक्ष शिवसेना शिंदे गटानेही या जागेवर दावा करून त्या अनुषंगाने हालचाली वाढविल्यामुळे भाजपलाही जागा सोडवून घेताना आटापिटा करावा लागणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हींकडून या जागेवर परस्परविरोधी दावे-प्रतिदावे होत आहेत.

इकडे महाविकास आघाडीमध्ये माकपचे नेते, माजी आमदार नरसय्या आडम यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला समर्थन दिल्याच्या मोबदल्यात शहरमध्य विधानसभेच्या जागेवर हक्क सांगून प्रत्यक्ष निवडणूक प्रचारही सुरू केला आहे. तर दुसरीकडे मुस्लीम समाजातून उमेदवारीसाठी काँग्रेसवर दबाव वाढला आहे. मोची समाजानेही तशाच पद्धतीने दबाव आणला आहे.

जोडीला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची काही वजनदार मंडळी उमेदवारीसाठी घोड्यावर बसली आहेत. काँग्रेसने मुस्लीम उमेदवार उभा केल्यास त्या विरोधात भाजपला धार्मिक ध्रुवीकरणाचा आधार घेऊन ही जागा काँग्रेसच्या ताब्यातून हिसकावून घेणे सुलभ जाणार असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.