बदलापूरमधील लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं शनिवार, २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील जनतेला बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं.
मुंबईतील शिवसेना भवनात त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली. बदलापूरमधील घटनेचा उद्धव ठाकरे यांनी तीव्र शब्दात निषेध केला. ‘या घटनेची केवळ निंदा करून भागणार नाही. या घटनेमुळं जनतेच्या मनात प्रचंड खदखद आहे. जनतेच्या मनात एक उद्वेग आहे. या उद्वेगाला वाचा फोडण्यासाठी महाविकास आघाडीनं २४ ऑगस्टला बंद पुकारला आहे. राज्यातील सर्व जनतेनं उत्स्फूर्तपणे त्यात सहभागी व्हावं, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं.
‘हा कोणत्याही राजकीय पक्षाचा बंद नाही. आपल्या माता-भगिनींसाठी आपण किती जागृत आहोत हे दाखवणारा हा बंद आहे. विकृतांच्या मनात दहशत बसवण्यासाठी हा बंद आहे. संवेदनाहीन व्यवस्थेच्या विरोधात हा बंद आहे. आम्हीही काहीही करू हे चालणार नाही हे दाखवण्यासाठी हा बंद आहे. कुणीही असं दुष्कृत्य करण्यास धजावू नये आणि असं काही झालंच तर त्याला ताबडतोब शिक्षा व्हावी यासाठी हा बंद आहे, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.