आज मुंबईत शरद पवार, उद्धव ठाकरे नाना पटोलेंची तातडीची बैठक, मविआ रणनीती ठरवणार

राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या राजकीय आणि सामाजिक विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची तातडीची बैठक उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि खासदार संजय राऊत उपस्थित असतील. ही बैठक दुपारी 12 वाजता होणार आहे.

दुसरीकडे मविआचे नेते सिंधुदुर्गजिल्ह्यातील मालवण येथील राजकोटला किल्ल्याला भेट देणार आहेत.  आजच्या बैठकीत महाविकास आघाडी पुढच्या वाटचालीबाबत रणनीती आखण्याची शक्यता आहे.उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार, नाना पटोले, संजय राऊत हे मविआचे प्रमुख नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत. गेल्या काही दिवसांत राज्यात घडलेल्या गंभीर घटना, राजकीय आणि सामाजिक घडामोडी यांवर या बैठकीत चर्चा केली जाणार असून महाविकास आघाडीची पुढील रणनीती व दिशा ठरवली जाणार आहे.

राज्यातील कायदा सुव्यवस्था, महिला सुरक्षा याबाबत  महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा होणार आहे, त्यासोबतच बदलापूर मधील घटना, राज्यात महिलांवर होणारे अत्याचार याबाबत महाविकास आघाडीतील महत्त्वाचे नेते  चर्चा करणार आहेत. मालवणमधील राजकोट किल्ल्यावर गेल्या आठ महिन्यांपूर्वी उभारलेला शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेला हा पुतळा निकृष्ट बांधकामामुळे अवघ्या आठ महिन्यांत कोसळला, असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. महाविकास आघाडीकडून या मुद्यावर राज्यात विविठ ठिकाणी आंदोलन देखील करण्यात येणार आहे.  आजच्या बैठकीत राज्यातील महिलांवर होणारे अत्याचार, सामाजिक घडामोडींबाबत चर्चा होणार आहे.  महाविकास आघाडीची भूमिका व पुढील रणनीती या सगळ्या बैठकीनंतर ठरणार आहे.