नेमेचि येतो पावसाळा म्हणीप्रमाणे नेहमीच येतो राडा गोकुळ वार्षिक सभेच्या दारी म्हणायची वेळ पुन्हा एकदा आली. आज (30 ऑगस्ट) कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये पुन्हा एकदा जोरदार रणकंदन पाहायला मिळाले. सत्ताधारी आणि विरोधी कार्यकर्ते एकमेकांविरोधात घोषणाबाजी करताना दिसून आले. त्याचबरोबर फलकबाजी सुद्धा रंगली. अनेक सभासद बॅरिकेट्स भेदून सभास्थळी आल्याने पोलिस आणि सभासदांमध्ये चांगलीच झटापट झाली.
गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा आज कागल एमआयडीसीमधील महालक्ष्मी पशुखाद्य प्रकल्पामध्ये होत आहे. मात्र, या सभेपूर्वीच विरोधी गटाकडून जोरदार पोस्टरबाजी करण्यात आल्यानं सभेचं वातावरण तापलं होतं. विरोधी संचालिका महाडिक यांच्यासमोर असलेल्या कार्यकर्ते आणि पोलिसांमध्येच चांगली झटापट झाली. झेंडे काढून घेण्यावरून ही झटापट झाली. दुपारी एक वाजता वार्षिक सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली. विरोधी गटाकडून नामंजूर, नामंजूरची घोषणाबाजी करून फलक झळकावण्यात आले.