इस्लामपूर – शिराळ्यात उमेदवारीसाठी पॉलिटिकल वॉर

इस्लामपूर – शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला आव्हान देण्यासाठी महायुती पुन्हा आक्रमक झाली आहे. मागील विधानसभा निवडणुकीचा लेखाजोखा पाहता भाजप नेत्यांनी इस्लामपूर – शिराळ्यात उमेदवारीसाठी फक्त पोकळ
आश्वासने दिल्याने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अभेद्य राहिला.नेत्यांमध्येच एकवाक्यता नसल्याने महायुतीच्या उमेदवारीबाबत संभ्रम कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्य पातळीवरील नेत्यांनी इस्लामपूरमध्ये लक्ष घातले आहे. काही दिवसांपूर्वी इस्लामपूर दौऱ्यावर आलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निशिकांत पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्याचा दावा पाटील समर्थक करत आहेत.

याउलट शिराळा मतदारसंघात वेगळीच परिस्थिती आहे. माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांना निवडून द्या, त्यांना कॅबिनेट मंत्री करू, असे आश्वासन कामेरी येथील प्रचार सभेत देणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नाईक यांना शेवटपर्यंत मंत्रिपद दिलेच नाही. आता ते शरदचंद्र पवार राष्ट्रवादीत आहेत. नुकतेच आलेले विनोद तावडे यांनीही नाईक यांच्याबरोबर बंद खोलीत अर्धा तास चर्चा केली.

भाजपचा झेंडा हाती घेतलेले पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते सत्यजीत देशमुख यांना मागील विधानसभेला दाखविलेल्या आमदारकीच्या स्वप्नाचा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केव्हाच विसर पडला आहे. त्यामुळेच शिराळा मतदारसंघात भाजपमधून सत्यजीत देशमुख आणि सम्राट महाडिक यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. त्यातच आता विनोद तावडे यांनी शिवाजीराव नाईक यांच्याशी चर्चा करून संभ्रम निर्माण केला आहे.एकंदरीत प्रत्येक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी इस्लामपूर – शिराळ्यात उमेदवारीसाठी इच्छुकांवर आश्वासनांचा पाऊस पाडला आहे.