राज्याच्या कानाकोपऱ्यात सध्या चर्चेत असलेली राज्य सरकारची ‘लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत आहे, या योजनेच्या श्रेयवादावरून देखील मोठ्या चर्चा आणि वाद होतानाचं चित्र आहे, अशातच काही दिवसांपुर्वी लाडकी बहीण योजनेतून ‘मुख्यमंत्री’ शब्द वगळल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील मंत्र्यांनी आक्षेप घेत मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार गटाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली होती, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे ते लाडकी बहीण योजनेचं पुर्ण नाव वापरणार असल्याची माहिती समोर आली आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा मोठा निर्णय
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार याच्यां पक्षाकडून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नावातून ‘मुख्यमंत्री’ हा शब्द वगळला जात असल्यामुळे शिवसेना (शिंदे गटाच्या) मंत्र्यांनी थेट मंत्रिमंडळ बैठकीमध्येच नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे महायुतीतील धुसफूस समोर आली होती. राज्यभरात अजित पवार आणि नेते या योजनेचा प्रचार आणि प्रसार करत आहेत, मात्र त्यांनी या योजनेतील मुख्यमंत्री शब्द वगळ्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांच्या नाराजीनंतर आता या योजनेचे पूर्ण नाव वापरण्याची हमी अजित पवार गटाने दिली असल्याची माहिती समोर आली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या मतदारसंघात आणि राज्याच्या काही भागात काढलेल्या अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेमध्ये पक्षाने लाडकी बहीण योजनेच्या प्रचारावर भर दिला आहे. मात्र, त्यांच्या सर्व बॅनरवर आणि त्यांच्या सोशल मीडियावर या योजनेचा उल्लेख केवळ ‘माझी लाडकी बहीण’ असा केला आहे, मुख्यमंत्री हा शब्द वगळून या योजनेचे सर्व श्रेय अर्थमंत्री म्हणून अजित पवार घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हणत शिवसेनेच्या मंत्र्यांनी गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आक्षेप घेतला होता. आता त्यामुळे आता या योजनेच्या अजित पवार गटाने यात दुरुस्ती करण्याचे ठरवले आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.