मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी गणरायाची प्राणप्रतिष्ठापणा..

आज राज्यासह देशभरात गणेश उत्सवाचे 2024 आनंददायी वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी गणरायाची विधीवत स्थापना झाली आहे. राज्यातील सर्व नागरिकांना गणेश चतुर्थीच्या मी शुभेच्छा देतो. गणरायाचा कृपाशीर्वाद राज्यातील शेतकरी, कष्टकरी आणि सर्वांवर कायम असो, अशी प्रार्थना मी गणरायाचरणी करतो. सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि सर्वांना निरोगी आयुष्य लाभो, हा आशीर्वाद मी गणरायांकडे मागतो. तसेच राज्यात बऱ्यापैकी पाऊस झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात देखील सुख समृद्धी लाभो, अशी मनोकामना मी गणराया चरणी मागितली असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना व्यक्त केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील वर्षा निवासस्थानी गणरायाची प्राणप्रतिष्ठापणा आणि विधिवत पूजन आज करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

सर्वत्र नव्या उत्साहाचं, नवचैतन्य निर्माण करणारे वातावरण

गणरायाच्या आगमनाने सर्वत्र नव्या उत्साहाचं आणि नवचैतन्य निर्माण करणारे वातावरण झाले आहे. विद्येची देवता गणराया चरणी मी प्रार्थना करतो की, आपला कृपा आशीर्वाद राज्यातील सर्व नागरिकांवर राहू दे. राज्यातील अनेक भागात अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला आहे. तर काही भागात अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्व परिस्थितीमध्ये आम्ही सरकार म्हणून त्यांच्या पाठीशी कायम आहोत. राज्य सरकारने गेल्या दोन अडीच वर्षात अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्प, योजना राबवून समाजातील सर्व स्तरातील लोकांना न्याय दिला आहे. इथून पुढे देखील आम्ही सरकार म्हणून जनतेच्या पाठीशी कायम असू. सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्याचा आमचा मानस असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

विदेशी गुंतवणुकीमध्ये भारतात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागला, ही अतिशय आनंददायी बाब आहे. सध्या घडीला देशात जेवढी गुंतवणूक होते त्याचे 52% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात होत आहे. अनेक उद्योग आज राज्यात येत आहेत. गुंतवणूकदारांसाठी सुपीक भाग म्हणून आज महाराष्ट्राकडे बघितलं जात आहे. यात अनेकांना रोजगार मिळणार असून सर्वसामान्यांसह राज्याच्या उन्नतीकडे आपली वाटचाल सुरू आहे. महाराष्ट्र सर्वांना अग्रगण्य होत असताना सरकार म्हणून आमचे देखील प्रामाणिक प्रयत्न आहेत. यासाठी गणरायांचा आशीर्वाद आम्हा सर्वांवर असाच कायम राहील, असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी बोलताना व्यक्त केला.