विधानसभेचे नगारे वाजत असताना इस्लामपूर मतदारसंघात मात्र जयंत पाटील यांच्यासमोरचा पैलवान कोण, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. महायुतीच्या जागावाटपात ही जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला की भाजपला, हा तिढा पहिल्यांदा सोडवावा लागेल.मात्र वरिष्ठ पातळीवरून उमेदवारावर अद्याप शिक्कामोर्तब झालेला नाही.
तेव्हा जयंत पाटील यांच्या विरोधात गतवेळचे भाजपचे उमेदवार निशिकांत पाटील, शिंदे शिवसेनेचे आनंदराव पवार की गौरव नायकवडी, यावर शिक्कामोर्तब होईल. जयंत पाटील नेहमीप्रमाणे विरोधकांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीची जबाबदारी ते सांभाळत राज्यभर दौरे करीत आहेत. असं म्हटलं जातं की, इथं जयंत पाटीलच आपल्या विरोधात कोण उमेदवार असावा, हे ठरवतात. यातला मिश्कीलपणा सोडला, तरी जयंतरावांना नेमका अंदाज आधीच आलेला असतो आणि ते त्याच्या विरोधकांची जुळणी आधीपासून सुरू करतात, हे मात्र सत्य आहे.
जयंतराव विजयी झाले की दुसऱ्या वर्षीपासूनच पुढची निवडणूक सोपी कशी जाईल, यासाठी पुढची चार वर्षे डाव मांडत असतात. विरोधकांतील वजीर हेरून त्यालाच प्रसंगी मैदानात उतरवून समोरच्या तयारीत असलेल्या राजाला चेकमेट करतात.