सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी पुन्हा एकदा पलटी मारली आहे. तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातून विधानसभेला माजी मंत्री अजित घोरपडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे काही दिवसांपूर्वीच खासदार पाटील यांनी म्हटले होते.
त्याला काही दिवस होत नाही तोच आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत तासगाव कवठेमहांकाळचे पुढचे आमदार रोहित पाटीलच असतील, अशी ग्वाही दिली. त्यामुळे विशाल पाटील यांच्या ‘यू टर्न’ची सांगलीत चर्चा आहे.
दरम्यान, सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी काही दिवसांपूर्वी तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा तयारीत असणारे माजी मंत्री अजित घोरपडे यांच्या पाठीशी राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र आता खासदार विशाल पाटलांनी पलटी मारली आहे.काही दिवसांपूर्वी विशाल पाटील यांनी खानापूरमध्ये एकनाथ शिंदे गटाचे सुहास बाबर यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली होती.
त्याबाबत महाविकास आघाडीत वाद रंगलेला असतानाच त्यांनी घोरपडे यांच्या पाठिंब्याबाबत सूतोवाच केले होते. मात्र, त्यावर त्यांनी लगेच आपल्याला असं म्हणायचं नव्हते, असे स्पष्टीकरण दिले होते. त्यामुळे विशाल पाटील यांच्या यू टर्नची एकच चर्चा आहे.