राजकीय खळबळ! प्रशांत परिचारकांची आ.आवताडेंवर बोचरी टीका….

शासन प्रत्येक तालुक्याला जिल्हा मार्ग, नॅशनल हायवेसह विविध विकासकामांसाठी प्रत्येक वर्षी निधी देत असते. मात्र, सध्या मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघात माझ्यामुळेच निधी आणला असे काही जण भासवत आहेत.जर मतदारसंघात तीन हजार कोटी आले असते, तर साड्या वाटायची वेळ आमदारांवर आली नसती, हे दुर्दैव आहे.

निवडणुकीच्या मतांसाठी कोणत्या थराला जायचे याचे संकेत पायदळी तुडवण्याचे काम सुरू असल्याची टीका माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केली.मंगळवेढा तालुक्यांतील मारोळी येथे भोसे जिल्हा परिषद गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती, त्यावेळी ते बोलत होते.

परिचारक पुढे म्हणाले, विधानसभा पोटनिवडणुकीत ज्या माझ्या कार्यकर्त्यांनी निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केले ज्यांनी त्यांना आमदार केले. त्यांना मदत करणे सोडाच त्यांना पोलिसांचा वापर करून जेलमध्ये टाकण्याचे उद्योग झाले.