मंत्री हसन मुश्रीफ यांची गाडी फोडल्याने, कोल्हापूरमधील निवासस्थानी कडक पोलीस बंदोबस्त

राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाहनाची मराठा आंदोलकांनी तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. मुंबईत मराठा आरक्षणासाठी आक्रमक मराठा आंदोलकांनी ही तोडफोड केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.

हसन मुश्रीफ यांची कार आकाशवाणी आमदार निवासाबाहेर उभी होती. त्यांनी अचानक आलेल्या काही जणांनी हसन मुश्रीफ यांच्या कारवर हल्ला चढवला. कारच्या काचा फोडल्या आहेत. मरीन ड्राइव्ह पोलीसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतलं आहे.

या घटनेनंतर मंत्रालय आणि आसपासच्या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. हसन मुश्रीफांच्या कोल्हापूरमधील निवासस्थानाबाहेरही पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. 

हसन मुश्रीफ यांनी वाहनावरील हल्ल्यानंतर म्हटलं की, मी सुरक्षित आहे. घटना घडली त्यावेळी मी तिथे नव्हतो. ज्यांनी गाड्या फोडल्या त्यांच्या भावना मी समजू शकतो. मी स्वतः गृह खात्याला फोन करुन त्यांच्यावर कारवाई करू नका, असं सांगणार आहे.

मात्र मंत्र्यांची घरे जाळणे, गाड्या फोडणे अत्यंत गंभीर आहे. यामुळे आंदोलनाला गालबोट लागत आहे. मराठा समाज हा आमचाच समाज आहे. आरक्षण मिळेपर्यंत आम्ही मराठा समाजाच्या पाठीशी राहणार आहोत, असं ही हसन मुश्रीफ यांनी म्हटलं.

सध्या ठराविक दोन ते तीन व्यक्ती ठरवून आमदार आणि खासदारांना फोन करत आहेत. त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल करत आहेत. कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत चर्चा झाली त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. आमच्या सर्व आमदारांची एक दिवशीय अधिवेशनाची मागणी आहे, असंही हसन मुश्रीफ यांनी म्हटलं.