गणपती विसर्जनाला जाताना काळाने घातला घाला, कार्यकर्ता ठार तर 11 जण जखमी!

ट्रॅक्टर ट्रॉलीतुन गणपती विसर्जनास जातानाच काळाने घाला घातल्याने मंडळाचा कार्यकर्ता ठार झाला तर अन्य अकरा जण जखमी झाल्याची दुर्घटना सोमवारी मध्यरात्री घडली. यामध्ये वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी येथील क्रांतिवीर गणेश मंडळाच्या सदस्यांचा समावेश आहे. अल्ताफ सिकंदर मुल्ला (वय ४०) असे मृताचे नाव आहे. जखमींवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कुरळप पोलीसात गुन्हा नोंद आहे.

जखमींवर इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमोल बाळासो पाटील (वय ३५) शंकर विलास पाटील (वय ४८), विनायक बाळासो पाटील (वय २१), संदीप सुभाष पाटील (वय ३४) ऋषिकेश बजरंग पाटील (वय ३२), रोहन बाळासो पाटील (वय ३१), शिवराज दत्तात्रय पाटील (वय २५), शंकर निवृत्ती तेवरे (वय २६), संकेत सुनील जोशी (वय १९) महेश बाबासो पाटील (वय ३५), मनोज शिवाजी पाटील (वय ३८, सर्व रा. येडेनिपाणी) अशी या अपघातातील जखमींची नावे आहेत.याबाबत अधिक माहिती अशी, येडेनिपाणीच्या ग्रामपंचायत परिसरात क्रांतिवीर मंडळाने गणेशाची स्थापना केली होती.रविवारी) सातव्या दिवशी मंडळाचे कार्यकर्ते गावातून ट्रॉलीतुन श्रींची मिरवणूक काढून विसर्जनासाठी येलुरच्या तलावाकडे चालले होते.

रात्री साडे बाराच्या सुमारास आशियाई महामार्गावरील इटकरे फाट्यावरून पुढे जाताच कोल्हापूर दिशेने जाणार्‍या भरधाव ट्रकने (क्र. एम. एच. १२ एन.एक्स ७३३२) ट्रॉलीस पाठीमागून जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की, ट्रॅक्टर ट्रॉली दुभाजकावर पलटी झाली.