बहेचा विकास राजकीय वादात खुंटला……


वाळवा तालुक्यातील बहे गावातील रस्ते अतिशय अरुंद असून या रस्त्यावर अनेकांनी अतिक्रमण केले आहे. बहे (ता. वाळवा) येथील रामलिंग बेट आणि अकरा मारुतीपैकी एक देवस्थान अशा निसर्गरम्य नटलेल्या कृष्णाकाठी वसलेल्या बहे गावातील सर्वांगीण विकास नेत्यांच्या राजकीय अंतर्गत वादात खुंटला आहे. गेली १०० वर्षे स्मशानभूमीही नाही, तर गावातील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणावरून अंतर्गत राजकारण पेटले आहे.

बहे येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कृष्णा आणि राजारामबापू सहकारी साखर कारखान्यांच्या सभासदांची संख्याही मोठी आहे. गावात तत्कालीन मंत्री आमदार जयंत पाटील यांचे दोन गट आहेत. सध्या जयंत पाटील यांच्याच गटाचे सरपंच संतोष दमामे असले तरी विरोधी गटात विठ्ठल पाटील यांचे नेतृत्व आहे.

स्थानिक निवडणुकीत दोन्ही गट आमने-सामने असतात. त्यामुळे गावातील विकास आणि श्रेयवाद यावरच राजकारण पेटलेले असते. गावात शंभर वर्षांपासून स्मशानभूमी नाही, यावर आवाजही उठवला होता. ग्रामसभेत याचा विषयही ग्रामस्थांनी उचलून धरला होता. तरीही याचा आजही निर्णय झाला नाही. यामध्येही अंतर्गत राजकारण असल्याचे बोलले जात आहे.