आबा बापूंची दोस्ती तुटणार का? कोण कोणती भूमिका घेणार? सर्वांचेच लक्ष….

सांगोला तालुक्यातील राजकीय पटलामध्ये महानायक आबा बापू यांची दोस्ती जगजाहीर आहेच. शालेय जीवनापासूनच्या या दिग्गज नेत्यांच्या मैत्रीच्या किस्से अनेक वेळा विविध व्यासपीठावरून ऐकायला आणि पाहायला मिळाले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये या दोन्ही नेत्यांनी एकत्र येत विधानसभेची विजयश्री आणली होती. आता मात्र लवकरच येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये या दोन्ही नेत्यांनी निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यात सर्वच राजकीय पक्षाचे वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील यांनी आपण विधानसभेचे मैदान सोडणार नसल्याचे सांगितले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनीदेखील शड्डू ठोकल्याने महायुतीतील उमेदवारीचा पेज निर्माण झालेला आहे.

सांगोला म्हटले की शेकाप चा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदार संघातून एकाच पक्षातून स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांनी अकरा वेळा विधानसभेची निवडणूक जिंकली होती. परंतु 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शेकापच्या बालेकिल्ल्याला सांगोला तालुक्यात आबा बापू यांनी पक्षभेद विसरून एकत्र येत शेकाप चा पराभव झालेला होता.

सध्या बापू यांनी या निवडणुकीतून आपण माघार घेणार नसून हे निवडणुकीचं मैदान सोडणार नसल्यास स्पष्ट केले आहे. त्याबरोबरच आबा यांनीही आता नाही तर कधीच नाही असं म्हणत या निवडणुकीत आर या पारची भूमिका घेत निवडणुकीतून माघार घेणार नसल्याच त्यांनी सांगितले.

मागील निवडणुकीमध्ये पक्षभेद विसरून एकत्र निवडणूक लढवलेले आबा बापू या निवडणुकीमध्ये कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माजी आमदार साळुंखे पाटील यांनी माघार घेतली नाही तर महायुतीच्या उमेदवारीचा पेच निर्माण होणार आहे. आबांचे कार्यकर्तेही आता कोणत्याही परिस्थितीत आबांनी निवडणूक लढवावी असा आग्रह करत असल्याचे चित्र सध्या दिसून येते.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार साळुंखे पाटील यांनी निवडणुकीच्या अगोदर गाव भेटीचा दौरा सुरू करत असताना गावागावातून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद सुद्धा मिळतोय व उमेदवारीसाठी आग्रह होताना दिसून येतोय. आगामी विधानसभा निवडणुकीच्या या धामधुमीत आबा बापू यांच्या जोडीमध्ये दुरावा येऊ नये हीच अपेक्षा दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त होताना दिसून येत आहे.