कोल्हापूर जिल्ह्यातील 4 हजार मतदारांचे आजपासून घरातून मतदान

विधानसभेसाठी जिल्ह्यातील दहा मतदारसंघांतील पात्र दिव्यांग आणि 85 वर्षांवरील 4 हजार 601 मतदारांच्या घरातून मतदानाला (होम व्होटिंग) गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. शनिवार, दि.16 पर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.दि.14 ते दि.16 या कालावधीत निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या पोलिस आणि होमगार्ड अधिकारी, कर्मचार्‍यांचेही मतदान होणार आहे.

जिल्ह्यातील 85 वर्षे अथवा त्यावरील, तसेच 40 टक्के किंवा त्यापेक्षा जादा अपंगत्व असलेल्या दिव्यांग मतदारांसाठी ‘होम व्होटिंग’चा (घरातूनच मतदान करण्याचा) पर्याय निवडणूक आयोगाने दिला आहे. त्यानुसार पात्र ठरणार्‍या एकूण 65 हजार 472 मतदारांपैकी 731 दिव्यांग आणि 3 हजार 870 वयोवृद्ध अशा एकूण 4 हजार 601 मतदारांचे ‘होम व्होटिंग’ होणार आहे.घरातून मतदानासाठी ज्यांनी नोंद केली आहे त्यांनी मतदानाचा हक्क बजवावा.

मतदानासाठी निवडणूक यंत्रणेकडून संबंधितांना संपर्क साधण्यात येणार आहे. कळविलेल्या दिवशी मतदार अनुपस्थित असल्यास त्यांना पुन्हा एक संधी दिली जाणार आहे. मात्र, दोन वेळा अनुपस्थित असलेल्या मतदारांना गृहमतदान करण्याची त्याचबरोबर मतदान केंद्रावर जावून मतदान करण्याची संधी मिळणार नाही, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.