इस्लामपूर मतदारसंघात असलेला जयंत पाटील यांचा बालेकिल्ला आगामी विधानसभेला २१ हजार मतांनी ढासळेल, असा दावा भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी केला.महायुतीतून उमेदवार अद्याप निश्चित नाही. परंतु, आपण गेल्या ५ वर्षापासून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहोत. महायुतीकडून एकास एकउमेदवार देण्याच्या हालचाली सुरू आहेत.
गेल्या काही वर्षांत इस्लामपूर मतदारसंघात विकासाच्या दृष्टीने महायुतीकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले. भाजप-शिवसेना यांच्या माध्यमातून इस्लामपूर शहरासह ग्रामीण भागात कोट्यवधीचा निधी उपलब्ध दिला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात एकच उमेदवार देण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.
यासाठी भाजपमधील अंतर्गत संघर्ष मिटवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. गत निवडणुकीतील मतांची टक्केवारी पाहता महायुतीकडून मीच उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार असेन, असा विश्वास निशिकांत पाटील यांनी व्यक्त केला.गणेशोत्सवानिमित्ताने आमदार जयंत पाटील यांनी राज्यभर संपर्क साधत आपले लक्ष इस्लामपूर मतदारसंघावर केंद्रित केले होते. त्यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांनीही मतदारसंघात आपला संपर्क वाढवला आहे.
लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या यशानंतर जयंत पाटील यांच्या नेतृत्वाची राज्य पातळीवर उंची वाढली. तरी मतदारसंघात मात्र विरोधक आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. विशेषत: निशिकांत पाटील यांनी थेट आव्हान दिल्याने लढत चुरशीची होणार आहे.