सध्याच्या काळात चोरीच्या प्रकरणांमध्ये भरमसाठ वाढ होऊ लागलेली आहे.दिवसाढवळ्या होत असलेल्या चोऱ्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे या चोरीचा छडा लावण्याचे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. इस्लामपूर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोबाईलबाबत तांत्रिक माहिती प्राप्त करून राज्यातील विविध जिल्ह्यातून बाहेरच्या राज्यातून ३ लाख ३० हजार रूपये किंमतीचे तब्बल ३० मोबाईल हँडसेट शोधून मुळ मालकांना परत दिले. मोबाईल मुळमालकांना परत मिळाल्याने मोबाईलधारकांकडून इस्लामपूर पोलीसांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.
इस्लामपूर शहर सांगली जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचे आहे. त्यामुळे आजुबाजुच्या गावामधून दररोज नोकरी, शिक्षण, बाजारामध्ये नागरिक येतात. प्रवास, बाजारपेठ, बसस्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण अधिक आहे. इस्लामपूर पोलीस ठाणे हदीत गर्दीच्या ठिकाणाहून नागरिकांचे मोबाईल गहाळ झाल्याबाबत इस्लामपूर पोलीस
ठाण्यास मोबाईल गहाळ मालमत्ता नोंदी केल्या होत्या.
पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर, पोलीस उपाधिक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय हारुगडे, पो. कॉ. अमोल सावंत, विशाल पांगे, शशीकांत शिंदे, दिपक घस्ते, कॉप्टन गुडेवाड, विवेक साळुंखे यांच्या पथकाने गहाळ झालेल्या मोबाईलबाबत तांत्रिक माहिती प्राप्त करून ३ लाख ३० हजार किंमतीचे तब्बल ३० मोबाईल हँडसेट शोध घेवुन मुळमालकांना परत केले.