मनसेची बैठक सोडून राज ठाकरे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्री शिंदेंसोबत बंद दाराआड चर्चा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने अद्याप निवडणुका जाहीर केलेल्या नाहीत. मात्र सध्या सर्वच पक्षांकडून राजकीय डावपेच आखले जात आहे. एकीकडे जागावाटप, मुख्यमंत्रिपद आणि उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. तरृ दुसरीकडे मोठमोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी, बैठका आणि चर्चासत्र सुरु आहेत. त्यातच आता राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडताना दिसत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या.मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या अॅक्शन मोडवर आले आहेत.

त्यातच सोमवारी सकाळीच राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्‍यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात जवळपास २० मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चा झाल्याचे बोललं जात आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये जागा वाटपावरून चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तसेच राज ठाकरेंनी राज्यातील विकास कामांबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

एकीकडे विधानसभा निहाय मनसेच्या निरीक्षकांची बैठक सुरू आहे. ज्यात किती जागांवर मनसे पारडं जड आहे, या संदर्भात चर्चा सुरू आहे. त्यामुळे किती जागा मनसे उत्तम प्रकारे लढू शकते? याची चाचपणी केली जात आहे. राज ठाकरे लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत गेले होते. त्यामुळे विधानसभेसाठी मनसे एकत्र आल्यास किती जागा महायुती सोडू शकते? याबाबत चर्चा होऊ शकते.दादर माहीम हा शिवसेनेचा पारंपारिक गड आहे.

जिथे आता सदा सरवणकर हे शिवसेनेचे आमदार आहेत. एकीकडे सदा सरवणकर यांना सिद्धिविनायक न्यास अध्यक्षपद दिले असताना ही जागा मनसेसाठी सोडावी याबद्दलही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच अमित ठाकरे यांनी विधानसभा लढवावी अशी आग्रहाची मागणी कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे जर अमित ठाकरे निवडणूक लढवतील तर त्यांना पाठिंबा असेल का? याबद्दलही राज ठाकरेंनी शिंदेंसोबत चर्चा केल्याचे बोललं जात आहे.

तसेच राज ठाकरे यांच्यावरील येक नंबर या सिनेमाचा ट्रेलर लॉन्चिंग बुधवारी करण्यात येणार आहे, यासाठीच आमंत्रण या बैठकीमध्ये दिलं जाणार आहे.दरम्यान राज ठाकरे यांनी त्यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी मनसे नेत्यांची एक महत्त्वाची बैठक बोलवली आहे. या बैठकीला प्रत्येक विधानसभा मतदारसंघांबद्दल आढावा घेतला जाणार आहे.