पंचगंगा नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारने सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेतला. इचलकरंजी परिसरातील औद्योगिक पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी अस्तित्वात असणाऱ्या दोन प्रकल्पांना उन्नतीकरण व क्षमता वाढ आणि एका नवीन प्रकल्पास मंजुरी दिली.त्यासाठी एकूण ६०९ कोटी ५८ लाख रुपये निधीही मंजूर केला आहे.
हे प्रकल्प उभारणीसाठी उद्योजकांना कोणतीही रक्कम घालावी लागणार नसल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये इचलकरंजी परिसरातील औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी ६०९ कोटी ५८ लाख रुपये मंजूर करण्यात आले.
या रकमेतून इचलकरंजी सहकारी औद्योगिक वसाहत व लक्ष्मी सहकारी औद्योगिक वसाहत यामध्ये अस्तित्वात असलेल्या सीईटीपी प्रकल्पाची सुधारणा व उन्नतीकरण आणि क्षमता वाढ करण्यात येणार आहे तसेच यड्राव (ता.शिरोळ) येथे नवीन सीईटीपी प्रकल्प बांधण्यात येणार आहे.महायुती सरकारने एकत्रित निर्णय घेत या तीन प्रकल्पांसाठी ६०९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.
मात्र, याबाबत आमदार प्रकाश आवाडे, त्यांचे पुत्र राहुल आवाडे, तसेच खासदार धैर्यशील माने आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने अशा सर्वांकडून या निधी मंजुरीबाबत आपण प्रयत्न केला असल्याची प्रसिद्धीपत्रके काढण्यात आली. त्यामुळे महायुतीअंतर्गत श्रेयवाद रंगल्याची चर्चा पुन्हा झाली.