महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीआधी लोकार्पण आणि भूमिपूजनाचा धडाका

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी दोघेही आज महाराष्ट्रात होते.पोहरादेवीतून मोदींच्या निशाण्यावर अधिक वेळ काँग्रेसचं राहिली. तर कोल्हापुरातून संविधान आणि जनगणनेवरुन राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं. एकाच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी महाराष्ट्रात आले. मोदी,पोहरादेवीतून काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर तुटून पडले तर राहुल गांधींनी कोल्हापुरातून भाजपवर निशाणा साधला.

बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवीत मोदींच्या हस्ते नगारा संग्रहालयाचं अनावरण झालं. मोदींनी नगाराही वाजवला. बंजारा समाजाच्या वतीनं परंपरागत नृत्यानं मोदींचं स्वागत झालं. जगदंबा देवीची आरतीही मोदींनी केली तर, राहुल गांधींच्या हस्ते कसबा बावड्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं. मोदी पोहरादेवीत होते, त्यामुळं बंजारा समाजावरुन काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं. स्वातंत्र्यानंतर बंजारा समाजाला, काँग्रेसनंच मुख्य प्रवाहापासून दूर ठेवल्याचा आरोप केला. तर सरकारी मोठ्या संस्थांमध्ये भाजपकडून संघाच्याच माणसांची भरती होते. दलित, आदिवासी आणि ओबीसी दिसत नाही, असा पलटवार राहुल गांधींनी केला.

पोहरादेवीत मोदींच्या हस्ते, पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचंही वितरण झालं. मात्र मोदींच्या भाषणात अधिक वेळ काँग्रेसच निशाण्यावर राहिली. काँग्रेसला शहरी नक्षली चालवत असल्याचा गंभीर आरोप मोदींनी केला आहे. इकडे उद्धव ठाकरेंनीही मोदी आणि मुख्यमंत्री शिंदेंवर शाब्दिक तोफ डागली. निवडणुकीआधी कितीही फिती कापा, निवडणुकीत भाजप आणि गद्दारांना जागा दाखवणार असा हल्लाबोल ठाकरेंनी केला. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा 8 दिवसांत होण्याची शक्यता आहे. त्याआधी लोकार्पण आणि भूमिपूजनाचा धडाका पाहायला मिळतोय. मग पोहरादेवीतील नगारा संग्राहलयासह किसान सन्मान निधीचं वितरण असो की ठाण्यात, मुंबईतील मेट्रो 3च्या पहिल्या फेजच्या शुभारंभासह ठाणे रिंग मेट्रोचं भूमीपूजन. आणि त्याच निमित्तानं प्रचाराचाही नारळ फुटलेलाच आहे.