सोन्याचा विषय लय हार्ड आहे, चांदीकडं क्रेडिटचं कार्ड आहे, ग्राहकांच्या खिशावर दरवाढीचा भार आहे

गेल्या दोन वर्षांपासून जगाला काही देशांनी वेठीला धरले आहे. यु्क्रेन-रशिया युद्ध, हमास, हिजबुल्लाह, इराण या तिकडीविरोधात इस्त्रायल असा सामना रंगला आहे. या युद्धामुळे अनेक वस्तू महागल्या आहेत. जगाला सोयाबीन, सूर्यफूल, गव्हापासून इतर अन्नधान्य पुरवठा करणारा युक्रेन युद्धग्रस्त आहे. तर आता इराणच्या तेल विहिरींना इस्त्रायल टार्गेट करण्याची भीती आहे. कच्चा तेलाचे भाव कधी नव्हे ते कमालीचे घसरले होते. या नव्या धोक्यामुळे ते वाढण्याची भीती आहे. गुडरिटर्न्सनुसार सोन्याने या आठवड्यात चांगलीच झेप घेतली आहे. तर चांदीचा भाव अपडेट झालेला नाही. चांदी 1 लाखांचा तर सोने 80 हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे.

सोन्याची मोठी मुलूखगिरी

मागील आठवड्यात सोने 1500 रुपयाने वधारले होते. तर या आठवड्यात सोने 760 रुपयांनी महागले. म्हणजे दोन आठवड्यात सोन्याने जवळपास 2300 रुपयांची दरवाढ नोंदवली. सुरुवातीला 30 सप्टेंबरला 160 तर 1 ऑक्टोबरला 330 रुपयांनी सोने स्वस्त झाले. 2 ऑक्टोबरला 540 रुपयांनी ते महागले. त्यानंतर सलग दोन दिवस सोने 110 रुपयांनी वाढले. एकूण 760 रुपयांची वृद्धी नोंदवली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,350 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,820 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीचा भाव अपडेट नाही

29 सप्टेंबरपासून चांदीचा भाव गुडरिटर्न्सवर अपडेट झालेला नाही. चांदीची कोणतीही खबरबात या संकेतस्थळावर उपलब्ध नाही. 28 सप्टेंबर रोजी शेवटचे 1 हजार रुपयांनी स्वस्ताईची नोंद आहे. त्यानंतर सलग सात दिवसांत भावात कोणताही बदल झालेला नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 95,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 75,964, 23 कॅरेट 75,660, 22 कॅरेट सोने 69,583 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 56,973 रुपये, 14 कॅरेट सोने 44,439 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 92,200 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.