विधानसभा निवडणूक! 5 दिवसात भरावे लागणार उमेदवारी अर्ज! अर्ज माघारीसाठी मिळणार दोनच दिवस…

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सातपैकी पाच दिवस तर अर्ज माघारीसाठी पाचपैकी दोन दिवसांचाच अवधी मिळणार आहे. ३१ ऑक्टोबरला नरक चतुर्थी असून त्यादिवशी जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारातील सुट्टी असणार आहे.पण, त्या दिवशी उमेदवारांना अर्ज माघार घेता येणार आहेत.

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन चार दिवस झाले, तरीदेखील अद्याप ना महायुती ना महाविकास आघाडीतील पक्षाकडून उमेदवारांची एकही यादी जाहीर झालेली नाही. सर्वच पक्षांकडून बंडखोरी होणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे उमेदवारांची यादी कधीपर्यंत जाहीर होणार आणि त्या उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी किती दिवस मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून प्रशासनाची संपूर्ण तयारी झाली आहे. इच्छुक उमेदवारांना २२ ते २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. त्यात शनिवार व रविवारी सुट्टी असणार आहे. उमेदवारांना अर्ज माघारीसाठी ३१ ऑक्टोबर व ४ नोव्हेंबर हे दोन दिवस मिळतील.