कोल्हापूर-तिरुपती विमानसेवा आजपासून सुरु

कोल्हापूर विमानतळ येथून आज रविवार (ता. ३१) पासून कोल्हापूर-तिरुपती ही विमानसेवा सुरू होत आहे.
ही विमानसेवा पुन्हा एकदा सुरू होत असल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.
कोल्हापूर-तिरुपती ही विमानसेवा यापूर्वी एका खासगी प्रवासी वाहतूक विमान कंपनीने सुरू केली होती. मात्र, काही कालवधीनंतर ती सेवा बंद झाल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात होती.

आता स्टार एअर कंपनीच्या वतीने कोल्हापूर – तिरुपती मार्गावर विमानसेवा पुन्हा सुरू केली आहे. कोल्हापुरातून आठवड्यातून तीन दिवस या मार्गावर ही विमानसेवा सुरू राहणार आहे. रविवार, मंगळवार आणि बुधवारी कोल्हापूर विमानतळावरून सकाळी ११ वाजता टेक ऑफ होईल. तिरुपतीला हे विमान दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी पोहोचणार आहे. त्याच दिवशी तिरुपतीहून दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी टेक ऑफ होईल आणि कोल्हापुरात दुपारी एक वाजून ४५ मिनिटांनी पोहोचणार आहे.