हातकणंगले विधानसभा मतदारसंघात रिपाइंकडून गणेश वाईकर यांना उमेदवारी

गेल्या पन्नास वर्षात विविध राजकीय पुढाऱ्यांनी अनेक संघटनांच्या माध्यमातून हातकणंगले विधानसभा मतदारसंघात जातीचे राजकारण करत निवडणूका लढवल्या. मात्र या मतदार संघातील जनतेला आजवर हक्कापासून वंचित रहावे लागले. त्यामुळे मतदार संघातील सर्वच मतदारांना न्याय व त्यांचा हक्क देण्यासाठी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया ( आंबेडकर पक्ष) यांच्यातर्फे डॉ. गणेश वाईकर यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा रूपाताई वायदंडे यांनी दिली. त्या पुढे म्हणाल्या, आजवर ज्यांनी या मतदार संघाचे नेतृत्व केले.

त्यांनी केवळ स्वतःचा स्वार्थ साधला आहे. काहींना जनतेने नाकारले, ज्यांनी भिम शक्ती व शिव शक्तीचा नारा दिला. त्यांना ही समाजाने हाकलून लावले. हा मतदार संघ म्हणजेच आम्हा सर्वांचा आरक्षित घटकांचा आहे. त्यामुळे या मतदार संघाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी डॉ. गणेश वाईकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेस विश्वासराव तरटे, डॉ. गणेश वाईकर, अमर तांदळे, समाधान सोनवले, वंदना वायदंडे, मिनाक्षी वाईकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.