ऐन दिवाळीच्या तोंडावर गोडेतेल, रवा, मैदा, बेसन, पोहे, गूळ, खोबऱ्यासह डाळींच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. जीवनावश्यक साहित्यांचे दर चांगलेच कडाडले आहेत, त्यामुळे लाडक्या बहिणींचे बजेट कोलमडले आहे.सणासुदीच्या व दिवाळीच्या तोंडावर फराळ बनविण्यासाठी जे जिन्नस लागतात त्या गोडेतेल, रवा, मैदा, बेसन, पोहे, गूळ, खोबऱ्यासह डाळींच्या दरात मोठी वाढ झाली आहे. याची झळ सामान्य लोकांना बसत आहे.
त्यामुळे दिवाळी कशी साजरी करायची, असा प्रश्न गृहिणी व सामान्य लोकांसमोर आहे.राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू करून सर्वसामान्य महिलांना महिन्याला दीड हजार रुपयांची मदत सुरू केली आहे. मात्र, दुसरीकडे महागाई वाढल्याने लाडक्या बहिणींचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागली जात आहे. लाडकी बहीण योजना सुरू होण्यापूर्वी खाद्यतेलाचा 14 किलोचा एक डबा 1600 रुपयाला मिळत होता. मात्र, दिवाळी सणाला काही दिवस बाकी आहेत, तोच हा डबा तब्बल 2200 रुपयांवर पोहोचला आहे.
हरभरा डाळ पूर्वी 70 रुपये किलो होती, ती आता 110 रुपयांना मिळत आहे. खोबरेही 120 रुपयांवरून तब्बल 230 रुपये किलो इतके महाग झाले आहे. रवा 35 रुपयांवरून 40 रुपयांपर्यंत पोहोचला असून, बेसन 80 रुपयांवरून 110 रुपयांपर्यंत वाढले आहे. त्यामुळे दिवाळी कशी साजरी करायची, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. ऐन सणासुदीच्या काळात गोडेतेल, रवा, मैदा यांच्या किमती वाढल्यामुळे गृहिणींनी नाराजी व्यक्त केली आहे.