हातकणंगले रेल्वे रूळावर सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली 

हातकणंगले – जयसिंगपूर रेल्वे रूळावर तारदाळ हद्दीत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यासह खूनाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले आहे. सुनिलकुमार भगवानदास रावत असे त्याचे नांव आहे. पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधातून पुष्पराज गाडे याने तीन अल्पवयीनांसह सहा साथीदारांच्या मदतीने रावत याचा काटा काढल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पुष्पराज रामसिंह गाडे (वय २१), संतोषकुमार जोगेश्वर सिंह (वय १९), शिवेंद्र रामकुशन सिंह (वय १९) या तिघांना अटक केली असून अन्य तीन अल्पवयीन (सर्व रा. मध्यप्रदेश) यांना जयसिंगपूर येथून ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, रविवारी सकाळच्या सुमारास तारदाळ गावच्या हद्दीतील रेल्वे रुळावर एका अज्ञात युवकाचा गळा आवळून खून करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह रेल्वे रुळावर टाकला होता. त्यावरुन रेल्वे गेल्याने मृतदेहाचे दोन तुकडे झाले होते. घटनेचे गांभिर्य ओळखून पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला पथके नेमून ओळख पटविण्यासह आरोपींना अटक करण्याच्या सूचना केल्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरिक्षक रविंद्र कळमकर यांनी दोन पथके तयार करुन गतीने तपास सुरु केला होता.

घटना घडलेल्या परिसरात मोठ्या संख्येने कारखाने असून याठिकाणी मजुरांची संख्या लक्षणीय असल्याने पोलिसांनी याठिकाणी चौकशी सुरु केली असता पोलिस अंमलदार महेश पाटील, महेश खोत व संजय कुंभार यांना मयताचे नांव सुनिलकुमार रावत असल्याचे समोर आले. त्यानंतर तो राहण्यास असलेल्या ठिकाणी जावून चौकशी केली असता रावत याचे त्याच परिसरात राहणाऱ्या पुष्पराज गाडे याच्याशी वाद झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी गाडे याचा शोध सुरु केला असता पुष्पराज गाडे, संतोषकुमार सिंह व शिवेंद्रसिंह व तीन अल्पवयीन मुले अशा सहाजणांना जयसिंगपूर रेल्वे स्थानकावरुन ताब्यात घेतले. अन्य एक अल्पवयीनचा यामध्ये समावेश आहे. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे निष्पन्न झाले. पुष्पराज गाडे याच्या पत्नीशी मयत सुनिलकुमार रावत याचे अनैतिक संबंध होते. त्या रागातूनच पुष्पराज याने सुनिलकुमार याला गावी जाण्याचे कारण सांगत घरातून नेले. त्यानंतर साथीदारांच्या मदतीने सुनिलकुमार याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने सुनिलकुमार याचा मृतदेह रेल्वे रुळावरुन नेऊन ठेवल्याची कबुली दिली आहे. अवघ्या २४ तासात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पथकाने या खुनाचा छडा लावत संशयितांनाही गजाआड केले.