चाकूचा धाक दाखवून सराफाकडे 10 लाखांची मागणी, खंडणीचा गुन्हा दाखल

सध्या सगळीकडेच गुन्हेगारी वाढतच आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. असाच एक खंडणीचा प्रकार उघडकीस आलेला आहे. सांगली शहरातील चांदणी चौक येथील सराफाच्या घरात घुसून चाकूचा धाक दाखवत दहा लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला. ही घटना 2 ऑगस्ट 2024 आणि सोमवार, 23 डिसेंबर 2024 या कालावधीत घडली.याप्रकरणी आकाश संभाजी माने (वय 35, रा. मूळ बामणी, ता. खानापूर, सध्या रा. चांदणी चौक, सांगली) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी राहुल ऊर्फ राजू सदाशिव मक्ते (वय 30) आणि किशन सुनील राजमाने (30, दोघे रा. सूतगिरणी चौक, कुपवाड) यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, माने कुटुंबीयांसह चांदणी चौक परिसरात राहतात. संशयित दोघे फिर्यादी माने यांच्या ओळखीचे आहेत. मक्ते आणि राजमाने हे माने यांनी दिलेल्या पैशांचा वापर दारू पिऊन चैनीसाठी करत होते. तसेच माने यांच्या कार्यालयात येऊन दंगा करत असतात. त्यामुळे माने यांनी त्यांना पैसे देणे बंद केले होते.

कार्यालयात दारू पिऊन येऊ नका, असे सांगितले असता, तुम्ही कुठे साजूक आहात? तुझे दारू पिल्याचे फोटो आमच्याकडे आहेत. ते समाजमाध्यमांवर पाठवू, अशी धमकी देत त्यांनी शिवीगाळ केली. यानंतर सोमवार, 23 डिसेंबर रोजी संशयित दोघेजण माने यांच्या घरी गेले. त्यांना चाकूचा धाक दाखवून, सायंकाळपर्यंत दहा लाख रुपये दे आणि सांगली सोडून जायचे, नाही तर ठार मारणार, तुझी नेतेगिरी चालू देणार नाही, अशी धमकी देऊन निघून गेले. या त्रासाला कंटाळून माने यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.