सांगली-मिरजेसह जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांत लढतीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर मंगळवारपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली. राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसह बंडखोर, अपक्षांनी प्रचाराचे नारळ फोडले.जाहीर प्रचारासाठी 13 दिवसांचा कालावधी असल्याने आता मतदारांच्या दारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी नियोजन केले आहे. बैठका, जाहीर सभा, कोपरा सभांचे नियोजन करण्यात येत असून येत्या दोन दिवसांमध्ये राजकीय वातावरणही चांगलेच तापणार आहे.
जिल्ह्यात महायुती आणि महाआघाडीत विधानसभेचा सामना रंगणार आहे. त्यात बंडखोर आणि अपक्षांची डोकेदुखीही वाढली आहे. सांगली, जत आणि खानापूर-आटपाडी या तीन मतदारसंघांत काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षामध्ये बंडखोरी झाली आहे. राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी बंड शमविण्याचा प्रयत्न केला. यात सांगली, शिराळा, मिरज या मतदारसंघांतील बंडोबांना थंड करण्यात यश आले. उर्वरित तीन मतदारसंघांत मात्र बंडखोरीमुळे महाआघाडी व महायुतीसमोर आव्हान उभे केले आहे.
उमेदवारी अर्ज माघारीनंतर आता सर्वच मतदारसंघांतील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. आता उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.राज्यातील बडे नेते पुढील आठवड्यात प्रचारासाठी जिल्ह्यात येणार आहेत. शुक्रवार, दि. 8 रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची शिराळ्यात सभा घेण्याचे नियोजन सुरू आहे. याशिवाय भाजप, शिवसेना व अजित पवार गटाचे नेतेही प्रचार सक्रिय होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आटपाडी येथे सभा होण्याची शक्यता आहे. महाआघाडीचे नेते शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अमित देशमुख, बाळासाहेब थोरात यांच्याही सभा जिल्ह्यात होणार आहेत. याशिवाय केंद्रीय नेतेही प्रचाराला येणार असल्याचे सांगण्यात आले.