Star Campaigners : निवडणुकीच्या रणधुमाळीत सेलिब्रेटींची हवा! प्रचाराच्या मैदानात!

राज्यात अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी (Mahaharashtra Assembly Election) कंबर कसून प्रत्येक राजकीय पक्षाचा प्रचार सुरु आहे. वार-प्रतिवार, बेधडक भाषणं, ठसठशीत मुद्दे अशा सगळ्याच गोष्टी सध्या सुरु आहेत. त्यातच आता राजकीय पक्षांच्या प्रचारांसाठी स्टार प्रचारक देखील मैदानात उतरले आहेत. भाऊ कदम (Bhau Kadam), कुशल बद्रिके (Kushal Badrike) आणि आता वर्षा उसगांवकर देखील प्रचाराच्या मैदानात उतरल्या आहेत.    

जालन्यातील घनसावंगी मतदारसंघांमध्ये मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचा रोड शो आयोजित करण्यात आला होता. शिवसेना उमेदवार हिकमत उढाण यांच्या प्रचारार्थ घनसावंगी शहरात रॅली काढण्यात आली होती. या रॅलीतून वर्षा उसगावकर ने हिकमत उढाण यांना मतदान करण्याच आवाहन केलं. घनसावंगी मतदारसंघ यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश टोपे विरुद्ध शिवसेनेचे उमेदवार हिकमत उढाण असा सामना रंगला आहे.

चला हवा येऊ द्या फेम अभिनेता भाऊ कदमही राष्ट्रवादी अजित पवार गटाचा स्टार प्रचारक म्हणून काम करणार आहे. नुकतच भाऊ कदम अजित पवारांसाठी स्टार प्रचारक म्हणून मैदानात उतरला आहे. सयाजी शिंदे यांच्यानंतर  भाऊ कदमही अजित पवारांच्या रॅलीमध्ये दिसणार आहे. अजित पवारांची लाडकी बहीण योजना यासह विविध योजनांची माहिती भाऊ कदम प्रचार रॅलीत सहभागी होऊन सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणार असल्याची माहिती मिळत आहे. 

भाजपमधून शिंदे गटात प्रवेश करत शायना एनसी यांनी मुंबादेवी मतदारसंघाचं तिकीट मिळवलं. त्यामुळे शायना एनसी आता धनुष्यबाण या चिन्हावर विधानसभेसाठी मैदानात उतरल्या आहेत. त्यांच्याच प्रचार रॅलीमध्ये त्यांच्यासोबत अभिनेता कुशल बद्रिके देखील होता. त्यामुळे कुशलही आता प्रचाराच्या मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय. 

महारष्ट्राच्या राजकीय लढतीचा निकाल हा अवघ्या काही दिवसांतच स्पष्ट होईल. पण त्याआधी मतदारांना आल्या बाजूने वळवण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाचे अगदी कसोशीचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातच त्यंन आकर्षित करण्याठी सेलिब्रेटींच्याही रोड शोचं आयोजन केलं जाणार आहे. त्यामुळे आता सेलिब्रेटींच्या या भूमिकेचा राजकीय पक्षांना फायदा होणार का हे येत्या 23 नोव्हेंबर रोजी स्पष्ट होईलच.