सांगोला तालुक्यात मतदान जनजागृती मोहीम

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी पंचायत समिती, सांगोला अंतर्गत गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी व स्वीप नोडल अधिकारी अभिजीत मोलाने यांच्या मार्गदर्शनाखाली आयसीडीएस यांचे मार्फत सोमवार दि.२ फेब्रुवारी रोजी सांगोला, वाढेगाव, मेडशिंगी व बामणी येथे मतदान जनजागृती मोहीम घेण्यात आली.

या मोहिमेत अंगणवाडीतील सेविका सहभागी झाल्या होत्या. लोकजागृतीसाठी त्यांनी रांगोळी, बॅनर, पोस्टरद्वारे मतदानाचे महत्त्व जनतेस पटवून दिले. प्रत्येकाचे मत हे महत्त्वाचे असून निर्भय व मुक्त मतदान करा, लोकशाही बळकट करा अशा घोषणा दिल्या.

यासाठी अंगणवाडी पर्यवेक्षिका अशा वाघमारे, राजश्री जंबेनाळ, पल्लवी चंदनशिवे, अर्चना सांगोलकर, माधुरी वाघमारे, सरस्वती जाधव यांनी सहभाग घेतला अशी माहिती मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत यांनी दिली. तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी नियुक्त केलेले मतदान अधिकारी व कर्मचारी यांचेपैकी सीटीईटी परीक्षा असल्याने आतापर्यंत एकूण २७६ लोकांचे आदेश विनंती अर्जावरून रद्द करण्यात आले असल्याची माहिती सहा.निवडणूक निर्णय अधिकारी बाळूताई भागवत यांनी दिली. ४०० नवीन फक्त महिला कर्मचारी यांना आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बी.आर.माळी यांनी दिली.

नवीन नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण आज मंगळवार दि.३ फेब्रुवारी रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह येथे आयोजित केले आहे अशी माहिती निवासी नायब तहसीलदार सोमनाथ साळुंखे व कैलास मडके यांनी दिली.