महाराष्ट्रातील काही शाळेत विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात अंडी देण्यात येतात. विद्यार्थ्यांना पंतप्रधान पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत आहारात अंडी दिली जातात. मात्र, याच निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी शिंदे गटाच्या धर्मवार अध्यात्मिक सेनेने मागणी केली आहे.पंतप्रधान पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शालेय मध्यान्ह भोजनामध्ये अंडी देण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याबाबत शिवसेना (Shivsena) अध्यात्मिक सेनेचे अध्यक्ष अक्षय भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिलं आहे.
अक्षय भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, ‘अंडी हा मांसाहारी (Nonveg) पदार्थ आहे. विद्यार्थ्यांना अंडी खाताना बघून शाकाहारी विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलट्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यात प्राथमिक व माध्यमिक कक्षेतील विद्यार्थी देखील केळी किंवा अंडी यातील फरक करून निर्णय घेण्यास सक्षम नाहीत’.
‘एकाच ठिकाणाहून शाकाहारी शालेय पोषण आहार आणि त्याच स्वयंपाकगृहातून अंड्याचे (मांसाहारी) प्रकार तयार केलेली शाकाहारी पदार्थ याविषयी शंका आहे. अंडीऐवजी सोया पदार्थ उडीद, गुळ, शेंगदाण्याचा लाडू, सुकामेवा देण्यात यावा, अशी मागणी भोसले यांनी पत्रातून केली आहे.
तत्पूर्वी, अंड्यातून बर्ड फ्ल्यू सुद्धा होण्याची शक्यता असते. अंड्यामध्ये असलेली अतिरिक्त कोलेस्ट्रॉल व ज्यामुळे लाभार्थ्यांना होणारे हृदयविकार हे सुद्धा चिंतेचे कारण आहे. याबाबींचा विचार करता पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेमध्ये अंडी (मांसाहारी पदार्थ असल्याने) शिक्षण मंत्रालयाद्वारे केलेले निर्देश ताबडतोब मागे घ्या, अशा आशयाचं पत्र अध्यात्मिक सेनेचे अध्यक्ष अक्षय भोसले यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे.