उद्या आहे उत्पत्ती एकादशी! जाणून घ्या तिथी, मुहूर्त आणि कथा

हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे. ज्यांना एकादशीचे व्रत सुरू करायचे आहे, ते उत्पन्न एकादशीपासून सुरु करु शकतात. पंचांगानुसार, वर्षभर वेगवेगळ्या एकादशी साजऱ्या केल्या जातात.त्यात उत्पत्ती एकादशीला विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार या एकादशीला एकादशी देवीचा जन्म झाला. त्यामुळे या एकादशीला उत्पत्ती एकादशी म्हणून ओळखले जाते. यंदा 8 डिसेंबर रोजी उत्पत्ती एकादशी आहे. जाणून घेऊया उत्पत्ती एकादशीचा शुभ मुहूर्त, कथा आणि महत्त्व.

पंचांगानुसार, 08 डिसेंबर 2023 रोजी पहाटे 05 वाजून 06 मिनिटांनी उत्पत्ती एकादशी तिथी प्रारंभ होईल. तर एकादशी तिथी 9 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 06 वाजून 31 मिनिटांनी समाप्त होईल. या व्रताचे पारण 9 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजून 58 मिनिटे ते 03 वाजून 06 मिनिटांपर्यंत करता येईल. यावेळी हरिवास समाप्त होण्याची वेळ दुपारी 12 वाजून 41 मिनिटे आहे.

उत्पन्न एकादशी कथा

पौराणिक कथेनुसार, सत्ययुगात एक राक्षस होता, ज्याचे नाव नदीजंग आणि त्याच्या मुलाचे नाव मुर होते. मुर खूप अतिशय शक्तिशाली होता. तो इतका बलशाली होता की, त्याने इंद्र ते यम आणि इतर देवतांचे राज्य त्याच्या ताब्यात घेतले होते. अशा स्थितीत सर्व देवांनी आपल्या समस्यांसह भगवान शंकराचा आश्रय घेतला. या समस्येचे निराकरण करण्यासाठी महादेवाने देवतांना भगवान श्रीहरी यांच्याकडे जाण्यास सांगितले. यानंतर सर्व देवांनी भगवान विष्णूंचा आश्रय घेत मदतीचे साकडे घातले.

देवतांची व्यथा लक्षात घेत भगवान विष्णू मुरचा पराभव करण्यासाठी रणांगणावर पोहोचले. या ठिकाणी मुर देवतांशी लढत होते. राक्षसाने भगवान विष्णूंना पाहताच त्यांच्यावरही हल्ला केला. पौराणिक कथेनुसार, मुर आणि भगवान विष्णू यांच्यातील युद्ध 10 हजार वर्षे चालले. भगवान विष्णूंनी अनेक आक्रमणे करूनही मुर राक्षसाचा पराभव होत नव्हाता.

अशी झाली एकादशीची उत्पत्ती

भीषण आशा या युद्धात थकल्यानंतर विश्रांतीसीठी श्रीहरी विष्णू बद्रिकाश्रमाच्या गुहेत जाऊन विश्रांती घेण्यासाठी गेले. मुर राक्षसही विष्णूचा पाठलाग करून त्या गुहेत पोहोचला. आणि श्रीहरींवर हल्ला करण्यासाठी आपले शस्त्र उगारले, तेव्हा भगवान विष्णूच्या शरीरातून एक तेजस्वी देवी प्रकट झाली आणि या देवीने मुर राक्षसाचा वध केला. भगवान विष्णू यांच्या शरिरातून प्रकट झालेली ही देवी एकादशी तिथीली प्रकट झाल्याने या देवीली एकादशी असे नाव पडले.

अशी करा पूजा

उत्पत्ती एकादशीचे व्रत हे खूप पवित्र असे आहे. या दिवशी विविधीवत पूजनासह काही नियम पळले पाहिजे. उत्पत्ती एकादशीच्या अदल्या दिवशी म्हणजेच दशमीच्या रात्री अन्न खाऊ नये. एकादशीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून घराची स्वच्छता करा. स्नान करुन देवाचे ध्यान करत व्रताचा संकल्प घ्या. यानंतर भगवान विष्णूच्या विधिवत पूजनाला सुरुवात करून देवाला फुले, पाणी, धूप, दीप, अक्षत इत्यादी वस्तू अर्पण करा.

उत्पत्ती एकादशीच्या दिवशी देवाला फक्त फळे अर्पण करावीत. भोग अर्पण केल्यानंतर भगवान विष्णूची आरती करावी. या एकादशीला रात्री जागरण करण्याचे महत्त्व आहे. जागरणानंसर व्रत दुसऱ्या दिवशी द्वादशीला सोडावे. या दिवशी गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला भोजन देत दान द्यावे. यानंतर पारणाच्या शुभ मुहूर्तावरच उपवास सोडावा.