राजूबाबा आवळे यांना श्रमिक मुक्तीदलाचा पाठींबा! मिणचे येथे ११ गावातील कार्यकर्त्यांचा मेळावा 

18 तारखेला प्रचाराचा अवधी संपत असून त्याच पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्यभरात महायुती आणि मविआच्या नेत्यांनी प्रचाराचा, सभांचा धडाका लावला आहे. प्रचार संपायला काहीच दिवस असून त्यापूर्वी राज्यात ठिकठिकाणी जाऊन मतदारांशी संवाद साधण्याचे सर्वांचेच प्रयत्न आहेत. मिणचे येथे श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने मतदारसंघातील ११ गावातील कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. धरणग्रस्तांच्या प्रश्नांची सोडवणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील उमेदवार राजूबाबा आवळे यांना श्रमिक मुक्तीदलाने पाठिंबा दिला आहे. गतवेळेच्या विजयाप्रमाणे या निवडणुकीतही कार्यकर्ते पूर्ण ताकदीने प्रयत्न करून आमदार राजूबाबा आवळे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करतील, असा विश्वास श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी व्यक्त केला.  डॉ. पाटणकर यांनी जाहीर केलेल्या पाठींब्याचे सर्व कार्यकर्त्यांनी हात उंचावून स्वागत करून घोषणा देत समर्थन दिले.

यावेळी आमदार राजू आवळे उपस्थित होते. शेकडो कार्यकर्त्यांनी आवळे यांना विजयी करण्याचा निर्धार यावेळी केला. डॉ. भारत पाटणकर म्हणाले, राज्यात महायुती सरकारने धरणग्रस्तांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी टाळाटाळ केली. सध्या अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. भाजपने निव्वळ पक्ष फोडाफोडी, समाजात द्वेष पसरविणे यालाच प्राधान्य दिले आहे.

उद्योगपतींच्या हिताचे निर्णय घेतले. कष्टकरी, शेतकरी कामगार यांच्या कल्याणासाठी धोरणात्मक निर्णय घेतलेले नाहीत. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीचा निश्चित पराभव होणार आहे.  आमदार आवळे म्हणाले, गेल्या पाच वर्षात सर्वांना सोबत घेत कोणताही गट तट न बघता प्रचंड विकासाची कामे केली. धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कुठेही कमी पडणार नाही. आघाडीवर राहून पाठपुरावा करीत त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करीन. गत वेळेच्या निवडणुकीत मला विजयी करण्यात महत्त्वपूर्ण साथ दिली. तशीच याही निवडणुकीत देणार याची खात्री आहे.