आतापासूनच ठेवला नेत्यांनी महामंडळांवर आणि विधान परिषदेवर काही डोळा……

मंत्रिमंडळ विस्तार पार पडल्यानंतर आता दिलेला शब्द पूर्ण करण्याची वेळ नेत्यांवर आली आहे. उमेदवारी देत असताना आपल्याच पक्षात कार्यकर्त्यांवर झालेला अन्याय थोपवण्यासाठी राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी विधान परिषद, महामंडळ आणि समित्यांच्या पदावर नियुक्ती करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याच्या पूर्ततेसाठी आता कार्यकर्ते आणि पदाधिकारी कामाला लागले आहेत. काहीजण विधान परिषदेसाठी तर काहीजण महामंडळ आणि विविध समित्यांवर नेमणूक होण्यासाठी फिल्डिंग लावत आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळाले. एका अपक्षासहित शिवसेनेला चार, तर भाजपला एका अपक्षसह तीन जागा मिळाल्या. सुरुवातीलाच महायुतीमुळे भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर उमेदवारीवरून अन्याय निर्माण झाला होता. शातच त्यांचे बंड थोपवण्यासाठी त्यातून मध्यमार्ग काढत विविध पदाचे आमिष दाखवले.

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून आगामी होऊ घातलेल्या विधान परिषदेसातेठी भाजपमधून माजी आमदार सुरेश हाळवणकर यांचे नाव आघाडीवर आहे. तर भाजप नेते महेश जाधव हे देखील विधान परिषदेवर जाण्यासाठी आग्रही आहेत. विधान परिषद न मिळाल्यास पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीवर अध्यक्षपदासाठी ते पुन्हा एकदा आग्रही आहेत. या देवस्थान समितीवर शिवसेनेने देखील आपला दावा सांगितला आहे.

तर राष्ट्रवादीकडूनही अनेक जण इच्छुक आहेत. शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी माजी खासदार संजय मंडलिक, माजी नगरसेवक सत्यजित कदम यांची नावे आघाडीवर आहेत.विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाल्यानंतर अंतर्गत घडामोडी मुळे रद्द करावी लागल्यामुळे कदम यांना राज्य नियोजन मंडळाची जबाबदारी देण्याचा शब्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीपूर्वी दिला होता. त्यामुळे एका पदावर त्यांची नियुक्ती निश्चित मानली जाते.

विधानसभा निवडणुकीनंतर मंडलिक यांचा एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क वाढलेला आहे. सातत्याने मंडलिक हे विविध घडामोडींच्या माध्यमातून राजकीय पटलावर येत आहेत. त्यामुळे मंडलिक विधान परिषदेवर जाण्याची शक्यता आहे. सर्व बाबीला अजून काही दिवस अवधी असला तरी आतापासूनच महामंडळांवर आणि विधान परिषदेवर काही नेत्यांनी डोळा ठेवला आहे हे नक्की.