Maharashtra vidhansabha Results : कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी

राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन होणार असल्याचे आता स्पष्ट झालं आहे. कारण, विधानसभा निवडणुकांच्या निकालात भाजप महायुतीने मोठी आघाडी घेतली आहे.तब्बल 200 पेक्षा जास्त जागांवर महायुतीला आघाडी असून अनेक उमेदवार विजयी देखील झाले आहेत. विशेष म्हणजे भाजपला 120 पेक्षा जास्त जागांवर आघाडी दिसत असून भाजपच राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे, भाजप कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी आत्ताच भाजपचा मुख्यमंत्री होणार, देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील, अशा आशयाचे बॅनरही झळकवायला सुरुवात केली आहे.

त्यामुळे, महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण, असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे. त्यातच, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी 25 तारखेला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणून, महाराष्ट्राचा नवीन सरकारमधील मुख्यमंत्री कोण हे कोडे लवकरच उलगडेल.राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ 26 तारखेला संपत असल्यामुळे एक दिवस आधीच महायुती सरकार स्थापन करणार असल्याची माहिती विश्वनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री कोण होणार हे पुढील 3 दिवसांतच स्पष्ट होईल, असे दिसून येते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे. महायुतीत ज्या पक्षाला जास्त जागा मिळतील, त्याचा मुख्यमंत्री, असं आमचं काही ठरलं नव्हतं.

प्रथम निवडणुकीच्या निकालाचे अंतिम आकडे येऊ दे. मग आम्ही तिन्ही पक्ष ज्याप्रमाणे जागावाटपाच्या चर्चेसाठी बसलो होतो, त्याप्रमाणे एकत्र बसू. पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे.पी.नड्डा आणि तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र बसून चर्चा करतील. आम्ही जशी निवडणूक लढलो तसा मुख्यमंत्रीपदाबाबतही एकत्र चर्चा करुन निर्णय घेऊ, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. त्यामुळे, एकनाथ शिंदेंकडूनही मुख्यमंत्रीपदावर दावा केल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, यंदा विधानसभेच्या निवडणुका गत 2019 च्या तुलनेत उशीरा झाल्याने विधानसभेचा कार्यकाळ पुढील तीन दिवसांत संपुष्टात येत आहे. त्यामुळे, 26 नोव्हेंबर पर्यंत राज्यात सरकार स्थापन होऊन महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळेल का हे पाहावे लागेल.