गेल्या पाच- सहा दिवसांत हवामानात प्रचंड गारठा आहे. वातावरणातील बदलामुळे वयोवृद्ध व बालकांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांना साथीच्या आजारांनी वेटोळे घातले आहे. रेंदाळ शहरात डेंग्यूचे वाढते संशयीत रुग्ण ही धोक्याची घंटा आहे. खासगी दवाखाने व शासकीय रुग्णालयांतही रुग्णांची उपचार घेण्यासाठी गर्दी आहे. डेंग्यू, चिकन गुनिया, हिवताप, अतिसार, मलेरिया, टायफॉइड यासारख्या आजारांची लक्षणे वाढत चालली आहेत. डेंग्यूचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.
हुपरी पंचक्रोशीतील गावांमध्ये डेंग्यू सदृश्य आजारांची साथ वाढत आहे. हिवताप, अतिसार, मलेरिया, टायफॉइड यासारखी लक्षणे असलेले रुग्ण आढळून येत आहेत. काही मुन्नाभाई डॉक्टर त्यांच्यावर उपचार करीत आहेत. खासगी दवाखाने हाऊसफुल्ल आहेत. मात्र दवाखान्याच्या प्रथमदर्शनी दरपत्रक लावलेले नसल्याने पॅकेज रेट वाढलेले आहेत. मनमानी पद्धतीमुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
दरम्यान, पोवार गल्ली रेंदाळ येथे एका शालेय विद्यार्थीनीला डेंग्यूची लागण झाल्याने खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. डेंग्यू सदृश रुग्णांची माहिती संकलित करून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देत ग्रामपंचायत प्रशासनाने साफसफाई बरोबरच औषध फवारणी करण्याची आवश्यकता आहे. डेंग्यूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी घंटागाडीतून कचरा संकलन स्वच्छता मोहीमेबरोबरच जनजागृतीची गरज आहे.
रेंदाळ शहरात अनेक खासगी दवाखाने आहेत. मात्र प्रथमदर्शनी दवाखान्यांचे दर पत्रक लावलेले नाहीत. याकडे आरोग्य विभागाचा कानाडोळा आहे. खासगी डॉक्टरांवर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे मनमानी कारभार सुरू आहे. यामध्ये फर्जी डॉक्टरांची संख्या हुपरी शहरात पाच ते सहा तर रेंदाळ मध्ये तीन आहे. हे आरोग्य अधिकाऱ्यांना माहिती नाही का असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. रुग्णांना अॅडमिट केल्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरील महागडी औषधे आणण्यास सांगतात. यामध्ये औषधांचा वापर कमी आणि परस्पर विल्हेवाट जास्त करतात अशी नागरिकांची बोलकी प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे.