खानापूर विधानसभा मतदारसंघात मंत्रिपदाचा दुष्काळ संपणार? सुहास बाबर यांना स्थान मिळणार का?मतदारसंघात उत्सुकता

खानापूर मतदारसंघात शिंदेसेनेचे आ. सुहास बाबर, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अॅड. वैभव पाटील व अपक्ष राजेंद्र देशमुख यांच्यात तिरंगी लढत झाली. मात्र, ही निवडणूक तशी दुरंगीच ठरली. आटपाडीच्या देशमुख यांना अडीच लाख झालेल्या मतदानात केवळ १४ हजार मते मिळाल्याने जनतेने त्यांना नाकारल्याचे स्पष्ट झाले.मात्र, या निवडणुकीत शिवसेनेचे आ. सुहास बाबर यांनी ७८ हजारांहून अधिक मताधिक्य घेत ऐतिहासिक विजय मिळविला.

खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या  निवडणुकीत  महायुतीतील शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी सांगली जिल्ह्यात सर्वाधिक मते घेऊन विजयी खेचून आणला. त्यामुळे आता आ. बाबर यांची नवीन मंत्रिमंडळात वर्णी लागणार का, याची उत्सुकता खानापूर मतदारसंघातील जनतेला लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आ. बाबर यांचा मंत्रिमंडळात समावेश केल्यास दिवंगत आमदार अनिलभाऊ बाबर यांचे मंत्रिपदाचे अधुरे स्वप्नही पूर्ण होऊन खानापूरचा मंत्रिपदाचा दुष्काळही संपणार आहे.

आता राज्याच्या नवीन मंत्रिमंडळ स्थापनेत आ. सुहास बाबर यांना स्थान मिळणार का, याची उत्सुकता खानापूरच्या जनतेला लागली आहे. परंतु, नवनिर्वाचित आमदार सुहास बाबर हे नवखे आहेत. त्यामुळे त्यांना पहिल्यांदा विधिमंडळ सभागृहाचे कामकाज कसे चालते, याचा अभ्यास करावा लागेल. त्यातच शिंदेसेनेला महायुतीत किती मंत्रिपदे मिळतात, यावरही बरेच काही अवलंबून असणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात आमदार सुहास बाबर यांना स्थान मिळते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. परंतु, मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना राज्यमंत्री मंडळात स्थान दिल्यास खानापूर मतदारसंघातील मंत्रिपदाचा दुष्काळ संपणार आहे, हे मात्र निश्चित.