ईव्हीएमविरोधात उद्धव ठाकरे मोठं आंदोलन उभारणार; मातोश्रीच्या बैठकीत निर्णय

आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पराभूत उमेदवारांची बैठक झाली. या बैठकीत ईव्हीएम मशीनविरोधात मोठं आंदोलन उभारण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी सुतोवाच केलं आहे. महाविकास आघाडी एकत्रित येऊन ईव्हीएमविरोधात आंदोलन करण्याची शक्यता आहे.विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम मशीन आणि मतमोजणी प्रक्रियेत झालेल्या गोंधळासंदर्भात पाढा वाचला. यानंतर उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीतील इतर नेत्यांशी बोलून ईव्हीएम मशीन घोटाळाविरोधात आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत.

जिथे-जिथे ईव्हीएम आणि मतमोजणीमध्ये गोंधळ झाला आहे त्या ठिकाणी सर्व पराभूत उमेदवारांना व्हीव्हीपॅट मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाला अर्ज करण्याच्या सूचना केले आहेत. किमान पाच टक्के तरी व्हीव्हीपॅट मतांची तपासणी करावी, अशी सूचना देखील उद्धव ठाकरेंनी पराभूत उमेदवारांना दिल्या आहेत. दरम्यान, आजच्या बैठकीत सर्वच पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम मशीनच्या गोंधळात संदर्भात रोष व्यक्त केला. त्यामुळे येणाऱ्या काळात याच कथित ईव्हीएम मशीन घोटाळ्या संदर्भात एक मोठं आंदोलन उभारण्याची तयारी महाविकास आघाडीकडून केली जाण्याची शक्यता आहे.