आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सोमवारी सांगोला बस स्थानकास भेट दिली. सांगोला बस स्थानक महामार्गावरील सोलापूर – सांगली महत्त्वाचे स्थानक आहे. दिवंगत भाई गणपतराव देशमुख यांनी प्रशस्त जागेत निर्माण केले आहे. बस स्थानकाची स्वच्छता, टापटीप यावरून आपल्या शहराची ओळख होते. यावेळी त्यांनी सांगोला बस डेपो, बस स्थानकाची पाहणी केली. बस डेपोतील वाढलेली चिलार झाडे तसेच स्थानकातील तुंबलेल्या गटारी नगर परिषदेच्या सहकार्याने स्वच्छ करा, शौचालये दररोज स्वच्छ करा अशा सूचना दिल्या.
महिला व शालेय मुलींची छेडछाड सहन केली जाणार नाही, स्थानकावर पोलीस बंदोबस्त देण्यासाठी सांगोला पोलीस ठाण्याला निवेदन द्या, मी त्याचा पाठपुरावा करेन असे सांगितले. तर एसटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणी वेळेवर करा. काही अडचणी आल्यास मला प्रत्यक्ष भेटा, कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले राहील यासाठी लक्ष द्यावे, असे आ. बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले. यावेळी कर्मचारी प्रवासी तसेच विद्यार्थ्यांची भेट घेऊन अडीअडचणी जाणून घेतल्या.
विद्यार्थी सकाळी लवकर शाळेस व कॉलेजला येत असतात. त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी बस स्थानकातील अधिकारी, कर्मचारी यांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन करून सांगोला बस स्थानकाच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले.