इस्लामपूर शहरातील वाहतूकीला देणार शिस्तीचे धडे 

इस्लामपूर पोलिसांच्या शहर वाहतूक शाखेकडून ज्या वाहनांवर दंड आकारला आहे त्या वाहनधारकांनी राजेश माने आपला प्रलंबित दंड वाहतूक शाखेच्या कार्यालयात भरून पुढील कारवाई टाळावी, तसेच जे वाहनधारक नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश माने यांनी  दिला. ते म्हणाले, पेठ – सांगली या राष्ट्रीय महामार्गासह शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक शाखेकडून योग्य ते उपाययोजना केल्या जात आहेत.

वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या कोणाचाही मुलाहीजा न ठेवता कारवाई केली जाणार आहे. पेठ – सांगली महामार्गावरील खड्यांमुळे अपघाताचे प्रकार घडत आहेत, तसेच वाहनधारकांना शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. याची दखल घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे खड्डे भरून देण्यासाठी पाठपुरावा करत आहोत.

माने म्हणाले, वाहन चोरीच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी शहरातील सर्व दुचाकी, चारचाकी शोरूममध्ये भेटी देऊन प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या नोंदणी आणि मान्यतेशिवाय वाहन ग्राहकांच्या ताब्यात देऊ नयेत, अशा सूचना दिल्या आहेत, तसेच दुचाकीला जीपीएस प्रणाली बसवून दिल्यास चोरीला जाणाऱ्या वाहनांचा शोध घेणे सुलभ होईल. त्यासाठी शोरूम चालकांना सूचना दिल्या आहेत.