आता उच्च शिक्षण घेणं सोप्पं, या योजनेतून मिळणार 10 लाखाचं कर्ज…

घरची बिकट परिस्थिती आणि आर्थिक चणचण यामुळे अनेकांना उच्च शिक्षणापासून मुकावं लागतं. काहींना उच्च शिक्षण घेण्यासाठी कुठून मदत मिळवावी याची माहिती नसते, त्यामुळे त्यांचं करिअर पुढे जात नाही. पण तुम्ही उच्च शिक्षण घेण्याची धडपड करत असाल आणि त्याचा खर्च लाखोंचा असला तरी चिंता करू नका. तुमची काळजी सरकारने घेतली आहे. केंद्र सरकारने “पीएम विद्यालक्ष्मी योजना” सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारकडून कर्ज दिलं जात आहे. त्याचा फायदा घेऊन तुम्ही तुमचं करिअर घडवू शकता.

पीएम विद्यालक्ष्मी योजनाचा उद्देश म्हणजे गुणवत्तेच्या आणि प्रतिष्ठित शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य पुरविणे. या योजनेमध्ये सरकार विद्यार्थ्यांना शिक्षण कर्जावर सबसिडी देखील देत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपलं उच्च शिक्षण पूर्ण करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

‘पीएम विद्यालक्ष्मी’ वेबसाईटवर करा अर्ज :
ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घ्यायचे आहे आणि त्यासाठी कर्ज हवं असेल तर त्यांनी “पीएम विद्यालक्ष्मी” या ऑनलाइन पोर्टलवर जाऊन अर्ज केला पाहिजे. या योजनेच्या अंतर्गत मोठ्या बँकांसोबतच खासगी बँका देखील समाविष्ट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी आता सहजपणे शिक्षणासाठी कर्ज घेऊ शकतात.

10 लाखांपर्यंत कर्ज :
पीएम विद्यालक्ष्मी योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना भारतातील संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. गुणवत्तेच्या शिक्षण संस्थांमध्ये (QHEI) प्रवेश घेतल्यास त्यांच्या ट्यूशन फी आणि इतर खर्चांसाठी बिनामूल्य गॅरंटीवर कर्ज मिळू शकते.

22 लाख विद्यार्थ्यांना कर्ज :
सरकारने विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पीएम विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत दरवर्षी 22 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना कर्ज देण्यात येणार आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याने 7.5 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतले, तर सरकारकडून 75% क्रेडिट गॅरंटी देखील दिली जाईल. याशिवाय, 8 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांच्या विद्यार्थ्यांना 3% व्याज सबसिडीसह 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकणार आहे.