इचलकरंजीचा पाणीपुरवठा होणार विस्कळीत! कृष्णा योजनेला गळती

इचलकरंजीचा पाणी प्रश्न हा सगळीकडेच चर्चेत आहे. पाईपलाईनची गळती तसेच विविध कारणांमुळे शहराला पाणीटंचाईचा प्रश्न खूपच भेडसावत आहे. अशातच आता मजरेवाडी येथून इचलकरंजी शहरास पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या कृष्णा नळ पाणीपुरवठा योजनेच्या जुनी पाण्याच्या दाबनलिकेस कुरुंदवाड शहरातील महाराणा प्रताप चौक, कुरुंदवाड हायस्कूल जवळ गळती लागली आहे. त्यामुळे बुधवार सायंकाळपासूनच पाणीपुरवठा तातडीने बंद करण्यात आला आहे.

यामुळे इचलकरंजी शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. सदर ठिकाणची गळती काढण्याचे काम महानगरपालिकेच्या वतीने तातडीने हाती घेण्यात आलेले आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा हा खंडित होणार आहे. गळती काढण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा साठा जपून वापरून महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक सुषमा शिंदे यांनी केले आहे.