वस्त्रनगरी इचलकरंजी अनेक कारणांनी नावारूपास आहे. यात आता आणखी भर पडलेली आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेत भारतीय महिला संघाला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणारी श्री. ना. बा. एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी कु. वैष्णवी बजरंग पोवार हिचे वस्त्रनगरी इचलकरंजीत जल्लोषी स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी करीत जीपमधून तिची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. तिच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी रांगोळी काढली होती.
या मिरवणुकीमध्ये वैष्णवी सोबत तिची आई सौ. माधुरी पोवार, वडील बजरंग पोवार, प्रशिक्षक तात्यासाहेब कुंमोजे आदी सहभागी होते. शिवतीर्थ येथून मिरवणुकीला सुरुवात झाली. वैष्णवीच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी तिचे स्वागत व सत्कारासाठी माजी आमदार प्रकाश आवाडे, प्रांताधिकारी सौ. मोसमी चौगुले, पोलिस उपअधिक्षक समीरसिंह साळवे, जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर, जिल्हा क्रीडाधिकारी सौ. नीलिमा आडसूळ, कोल्हापूर खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष राजन उरुणकर, सुनिल पाटील, ना.बा. एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीनिवास बोहरा, ट्रेझरर महेश बांदवलकर, मारुतराव निर्माणकर, अहमद म जावर, श्रीकांत चंगेडिया, सुरेंद्रकुमार बांगड, क्रीडा संघटक शेखर शहा, अमित कागले उपस्थित होते.