भाजप आणि मनसे एकत्र का येणार? फडणवीसांच्या डोक्यात वेगळाच प्लॅन,

आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि मनसे एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. भाजपने एकत्र येण्याचा प्रस्ताव दिल्यास मनसे (MNS) देखील प्रस्ताव स्विकारण्यास तयार असल्याचे सांगितले जात आहे.पालिका निवडणुकीत भाजपसोबत एकत्र येण्यास मनसे सकारात्मक असल्याची माहिती आहे. भाजपकडून प्रस्ताव आल्यास मनसे विचार करणार असल्याची माहिती आहे. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये जिथे शक्य असेल तिथे राज ठाकरे यांना सोबत घेऊ, त्यांच्यासोबत युती करु असे मोठे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले. पण फडणवीसांच्या वक्तव्याअगोदर निवडणुकीतील पराभवानंतर मनसेची एक बैठक झाली होती.

त्या मंथन बैठकीत सर्व नेत्यांचे मतं जाणून घेतली. त्या बैठकीत एकमत झाले की आपण आता विचार न करता फक्त हिंदूत्वाच्या मार्गाने पुढे गेले पाहिजे. त्यासाठी आपण भाजपसोबत राहणे गरजेचे असल्याचे मत नेत्यांनी मांडले.लोकसभा निवडणुकीत आपण भाजपला मदत केली आहे. विधानसभा जरी आपण स्वबळावर लढल्या आणि निकाल आपल्या बाजूने लागला नसला तरी आपण आता भाजपसोबतच राहिले पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वक्तव्य केल्यानंतर याला आणखीच बळ मिळाले असून मनसे नेत्यांनी आम्ही सकारात्मक असल्याचे मत दिल्याची माहिती आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे देखील सकारात्मक असल्याच्या चर्चा आहेत.