राज्यात फडणवीस सरकार अस्तित्वात आलं आहे. 5 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रि अजित पवार यांचा शपथविधी झाला. खरंतर या दिवशी फडणवीस सरकारच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार होता. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा अल्पावधीचा असल्याने संपूर्ण मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला नाही. त्या दिवशी केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथ विधी झाला.
त्यानंतर उर्वरित मंत्रिमंडळाचा शपथविधी कधी होणार? याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबतच्या हालचाली वाढल्या आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची काल याबाबत महत्वाची बैठक पार पडली आहे.काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली. मुख्यमंत्र्यांचा निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ निवासस्थानी फडणवीस आणि शिंदेंमध्ये एक तासभर चर्चा झाली. यावेळी मंत्रिमंडळ विस्तार आणि हिवाळी अधिवेशनावर चर्चा झाली. शिवसेना एकनाथ शिंदे गटाला 10 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्रिपदं दिली जाणार असल्याची माहिती आहे.
सध्या विधिमंडळाचं विशेष अधिवेशन होत आहे. यात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला. हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी या नवनिर्वाचित आमदारांना शपथ दिली. 7 डिसेंबरला हे अधिवेशन सुरु झालं. तर आज 9 डिसेंबरला हे अधिवेशन संपणार आहे.येत्या 16 डिसेंबरला विधिमंडळाचं हिवाळी अधिनेशन होणार आहे. मात्र त्या आधी मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. राजभवनावर हा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. तसंच 11 डिसेंबरला हा शपथविधी होऊ शकतो, असं महायुतीतीलच काही नेत्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.