एकनाथ शिंदेंचा नवा गौप्यस्फोट! आम्ही राज ठाकरेंच्या मनसेला ऑफर दिली होती, पण….

माहीम विधानसभा मतदारसंघात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेंविरोधात उमेदवार उतरवण्याच्या मुद्द्यावरुन सध्या मनसे आणि शिंदे गटात वितुष्ट निर्माण झाले आहे. महायुतीच्या नेत्यांनी आग्रह करुनही शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांनी माहीम विधानसभा मतदारसंघातून माघार घेतली नव्हती. त्यामुळे राज ठाकरे संतापल्याची चर्चा होती. त्यांनी शिवतीर्थवर भेटीसाठी आलेल्या सदा सरवणकर यांना माघारी पाठवले होते. या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत नवा गौप्यस्फोट केला आहे.

मनसेचे आमच्याशी भांडूप विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलणे झाले होते. तसेही आम्ही शिवडीत बाळा नांदगावकर यांच्या मतदारसंघात उमेदवार दिलेला नाही. अमित ठाकरे भांडूपमधून लढतील असे आम्हाला सांगण्यात आलं होतं. त्यामुळे आम्ही त्यानुसारच पुढील आखणी केली. पण त्यांनतर राज ठाकरे यांनी अमित यांना थेट माहीम विधानसभेतून उमेदवारीची घोषित केली. यानंतर मी सदा सरवणकर यांच्याशी बोललो. त्यांनी मला सांगितलं की, जर माहीममध्ये अमित ठाकरे आणि ठाकरे गटाचे महेश सावंत यांच्यात डायरेक्ट लढत झाली तर अमितच्या जिंकण्याची शक्यता कमी आहे. परंतु, तिरंगी लढत झाल्यास मात्र आम्हा दोघांपैकी एकाला संधी आहे.

यानंतर मी सदा सरवणकरांना राज यांना भेटून माहीमधील जातीय समीकरण समजावायला सांगितले, पण राज ठाकरे त्यांना भेटले नाहीत, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गोटातून काही प्रतिक्रिया येणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.